सिद्धान्त आणि व्यवहार
देवनागरी मुद्राक्षरविद्येचा परिचय करून देणारे पुस्तक.
मुद्राक्षरविद्या हा मुद्रणकलेचा आणि लेखनवाचनाच्या व्यवहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. मात्र मुद्राक्षरविद्येतील विविध संकल्पना, सैद्धान्तिक भूमिका, तांत्रिक बारकावे आणि कलात्मक उपयोजन ह्यांची सर्वसामान्य वापरकर्त्यांपासून टंकरचना करणाऱ्या अभिकल्पकांपर्यंत पोहोचणारी चर्चा मराठीत मर्यादित प्रमाणातच झालेली आहे. विशेषतः देवनागरीसंदर्भात मुद्राक्षरविद्येच्या वेगवेगळ्या पैलूंचा परिचय मराठी भाषकांना व्हावा, ह्यासाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या विनंतीनुसार ‘मुद्राक्षरविद्या’ हे पुस्तक लिहिण्यात आलेले असून ते ह्याच संस्थेने प्रकाशित केले आहे.
उपोद्धात आणि उपसंहार वगळता पुस्तकाची विभागणी एकूण ६ प्रकरणांत केली असून पुस्तकाच्या शेवटी ३ परिशिष्टे, शब्दावली आणि ग्रंथसूची ह्यांचा समावेश आहे. तसेच पुस्तकातील संदर्भ शोधणे सुलभ व्हावे ह्यासाठी पुस्तकातील संकल्पना, व्यक्ती, संस्था, टंक इत्यादींचा निर्देश करणारी निर्देशसूचीही जोडण्यात आली आहे. उपोद्घातात पुस्तकाच्या रचनेमागील हेतू स्पष्ट करून ह्या लेखनाचे लेखकाला अभिप्रेत असलेले फलित वाचकांना समजावून देण्यात आले आहे. विषयप्रवेश ह्या पहिल्या प्रकरणात मुद्राक्षरविद्या आणि सिद्धान्तन ह्यांच्या संबंधावर प्रकाश टाकण्यात आला असून सिद्धान्ताची आवश्यकता आणि सिद्धान्ताची भूमिका स्पष्ट करून मांडण्यात आली आहे.
देवनागरी लिपी : स्वरूप आणि व्याप्ती ह्या प्रकरणात देवनागरी लिपी कोणकोणत्या भाषा लिहिण्यासाठी वापरात आहे, ह्या भाषा लिहिण्यासाठी तिच्यात कोणकोणती चिन्हे वापरण्यात येतात, त्या चिन्हांची रचना कशी होते, देवनागरी लिपीत सुधारणेचे कोणते प्रयत्न आणि ते का करण्यात आले ह्यांचा आढावा आणि विविध क्षेत्रांत (उदा॰ संगीत) देवनागरीचा वापर होताना कोणती वैशिष्ट्ये आढळतात ह्याचे सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. मुद्रणकलेचा इतिहास ह्या प्रकरणात प्रथम इतिहासलेखनातील अडचणींची चर्चा करून त्यानंतर मुद्रणाचे विविध प्रकार, त्यांसाठी उपयोजण्यात आलेली विविध तंत्रे, मुद्रणाचा सामाजिक परिस्थितीवर झालेला परिणाम, भविष्यातील मुद्रणाचे तंत्र अशा विविध विषयांची साधार चर्चा करण्यात आली आहे.
मुद्राक्षरे आणि मुद्राक्षरांची रचनावैशिष्ट्ये ह्या प्रकरणात मुद्राक्षरांशी संबंधित विविध संज्ञा आणि त्यांच्या व्याख्या ह्यांचा आढावा घेण्यात आला आहे. मुद्राक्षरांचे वर्णन करण्यासाठी योजण्यात येणाऱ्या विभाजनरेखांविषयी विविध तज्ज्ञांच्या मांडणीचा आढावा घेण्यात आला आहे. मुद्राक्षरांची विविध अंगे आणि त्यांतून साकारणारी विविध दृश्यवैशिष्ट्ये ह्यांची सविस्तर आणि सोदाहरण चर्चा ह्या प्रकरणात करण्यात आली असून त्यायोगे मुद्राक्षरांच्या दृश्यरचनांतील साम्यभेद स्पष्ट व्हायला साहाय्य होण्याजोगे आहे. मुद्राक्षरांचे वर्गीकरण ह्या प्रकरणात वर्गीकरणाची आवश्यकता, वर्गीकरणाचे प्रकार, मुद्राक्षरांची व्यवच्छेदक वैशिष्ट्ये ह्यांचे विवेचन आले आहे. तसेच मजकुराची मुद्राक्षरे आणि दर्शनी मुद्राक्षरे ह्या उपभेदाची चर्चा करून शैलीनुसार मुद्राक्षरांचे विविध प्रकारचे वर्गीकरण कसे करण्यात येते ह्याची चर्चा करण्यात आली आहे.
अक्षरजुळणी ह्या शेवटच्या प्रकरणात मुद्राक्षरकला आणि अक्षरजुळणी ह्यांतील विविध प्रक्रिया आणि संकल्पना ह्यांची चर्चा करण्यात आली असून अक्षरजुळणी करताना कोणकोणती मार्गदर्शक तत्त्वे स्वीकारण्यात येतात ह्यांची माहिती पुरवण्यात आली आहे. शेवटी मुद्रणकलेतील विविध वादांचा परामर्श घेण्यात आला असून त्यात मुद्राक्षरांच्या दृश्यरूपांविषयीचे वाद तसेच प्रतिमुद्राधिकार (स्वामित्व), मुद्राक्षरांचा अस्सलपणा इत्यादी संकल्पनांविषयी चर्चा मांडण्यात आली आहे. उपसंहारात पुस्तकाच्या मर्यादा स्पष्ट करून पुस्तकाच्या सद्य स्वरूपाची मीमांसा करण्यात आली आहे.
गिरीश दळवी हे आय. आय. टी. मुंबई येथील आय. डी. सी. अभिकल्प विद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी संगणक-अभियांत्रिकी ह्या विषयात स्नातक पदवी, अभिकल्प ह्या विषयात स्नातकोत्तर पदवी तसेच आय. आय. टी. मुंबई येथून पी. एच. डी. ह्या पदव्या संपादित केल्या आहेत. ‘देवनागरी मुद्राक्षरांचे सैद्धान्तिक प्रारूपण’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता.
एक टाइप ह्या मुद्राक्षर-निर्मिती करणाऱ्या व्यावसायिक संस्थेचे ते संस्थापक-सदस्य असून त्यांनी मुक्त, जैनी, अनेक ह्यांसारख्या विविध आणि अद्ययावत तंत्रज्ञानाशी सुसंगत अशा टंकांची (फॉण्ट) रचना व निर्मिती केली आहे. ह्यांपैकी बहुतेक टंक त्यांनी मुक्त (फ्री ॲण्ड ओपन सोर्स) परवान्याअंतर्गत वितरित केले आहेत.
राज्य मराठी विकास संस्थेच्या देवनागरी मुक्त टंकांच्या प्रकल्पात त्यांनी तज्ज्ञ परीक्षक व मार्गदर्शक म्हणून योगदान दिले असून महाराष्ट्र शासनाच्या भाषा-सल्लागार-समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. प्रस्तुत पुस्तक हे त्यांच्या दीर्घ व्यासंगातून सिद्ध झाले आहे.
- भाषा
- मराठी
- आवृत्ती
- पहिली आवृत्ती, २०२६
- बांधणी
- हार्ड बाउंड
- पृष्ठे
- ३५०
- कागद
- ८० जीएसएम, आम्लविरहित
- ISBN
- 978-93-85802-36-2
- किंमत
- ₹ ७०० (₹ ५५० + टपाल खर्च)
प्रकाशक
राज्य मराठी विकास संस्था
एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय इमारत, ३ महापालिका मार्ग,
धोबीतलाव, मुंबई – ४०० ००१
मुद्रक : इंडिया प्रिंटिंग वर्क्स, मुंबई




