Englishहिन्दी

गिरीश दळवी हे भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आय॰ आय॰ टी॰) मुंबई येथील औद्योगिक अभिकल्प केन्द्रात (आय॰ डी॰ सी॰) अभिकल्प ह्या विषयाचे साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून ते संप्रेषण अभिकल्प, अन्योन्यक्रिया अभिकल्प आणि अभिकल्प संशोधन ह्या विषयांचे अध्यापन करतात. त्यांचे संशोधनाचे विषय पुढीलप्रमाणे आहेत.

संप्रेषण अभिकल्प — देवनागरी मुद्राक्षरविद्या (देवनागरी टंकांचा इतिहास, टंकरचनेच्या कार्यपद्धती, देवनागरी मुद्राक्षरांचे सैद्धान्तिक प्रारूपण, वर्गीकरण आणि टंक-संस्कृती). अन्योन्यक्रिया अभिकल्प — संस्कृतिसापेक्ष अन्योन्यक्रिया (उदा॰ संगणक-मानव-संवादातील स्थानिकीकरण), अल्पमोली संगणन (कमी खर्चाच्या संगणनाच्या सोयी. उदा॰ आकाश टॅब्लेटसारखी अल्पमोली साधने), माहिती शोधण्याचे निकष, भारतीय भाषांकरता संवादपटल (इंटरफेस) तसेच भारतीय लिप्यांत मजकूर नोंदवण्याच्या सोयी. अभिकल्प प्रक्रियेतील सांख्यकीय आणि गणिती प्रारूपे तयार करण्याची तंत्रे हा एक अभिकल्प संशोधक म्हणून दळवी ह्यांचे संशोधनाचे विषय आहे.

त्यांनी संगणक-अभियांत्रिकी ह्या विषयात स्नातक पदवी, अभिकल्प ह्या विषयात स्नातकोत्तर पदवी तसेच आय॰ आय॰ टी॰, मुंबई येथून पीएचडी ह्या पदव्या संपादित केल्या आहेत. ‘देवनागरी मुद्राक्षरांचे सैद्धान्तिक प्रारूपण’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. ‘एक’ हा बहुलिपी टंकसमूह, ‘एक मुक्त’ हा मुक्तस्रोत टंकसमूह , ‘लाइफओके’ हा देवनागरी टंक आणि ‘स्टार बंगाली’ हा बाङ्ला टंक ह्यांसारखे विविध भारतीय लिप्यांचे टंक तयार करण्यात टंकरचनाकार म्हणून त्यांनी सहभाग घेतला आहे.

संपर्क साधायला girish.dalvi@iitb.ac.in या पत्त्यावर निःसंकोच पत्र पाठवावे.